पोलादपूर ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर रविवारी (दि. 2) सकाळी वीकेण्ड लॉकडाऊनमुळे तुरळक वाहतूक सुरू असताना पारले मराठी शाळेजवळील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडजवळ एका कंटेनरला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर कंटेनर भर रस्त्यावर उभा करून चालकाने पलायन केले होते, मात्र आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलादपूर पोलिसांना कंटेनरचालकालाही पकडण्यात यश आले.
पोलादपूर तालुक्यातील पारले येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोरील उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महाडकडून पोलादपूरच्या दिशेने येणार्या एका कंटेनरला अचानक आग लागली. या वेळी चालकाने कंटेनरला लागलेल्या आगीमुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्व्हिस रोडवरच कंटेनर सोडून जीव वाचविण्यासाठी पलायन केले.
आगीचे वृत्त कळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि महाड औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना झाले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान, पोलादपूर पोलिसांनी आग लागल्यानंतर कंटेनर रस्त्यावर उभा करून पळून गेलेल्या चालकाला ताब्यात घेतले. पोलादपूर तालुक्यात पारले ते लोहारेदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतची झाडे कापण्यात आल्याने काँक्रीटचा रस्ता व पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तापमानवाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच कंटेनरमधील मटेरियलने अचानक पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.