खोपोली पालिकेकडून दंडात्मक कारवाई
खोपोली ः प्रतिनिधी – खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी गुरुवारी (दि. 2) एका बैठकीत खोपोली नगरपालिका प्रशासन कोरोनाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खोपोली पालिका प्रशासनाकडून आक्रमक भूमिका घेत नगरपालिका हद्दीत विविध भागांत धडक कारवाई करण्यात आली. यात रस्त्यावर थुकणार्यांवर, मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणारे, दुकाने व विविध आस्थापनांच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, विनाकारण बाहेर फिरणारे अशा सर्वांना हेरून पालिका पथकाने या सर्वांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी एकाच दिवशी जवळपास 32 जणांवर अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यात मास्क न वापरणार्यांना 200 रुपये, सार्वजनिक जागेत किंवा रस्त्यांवर थुकणार्यांना 100 रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्यांकडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर धडक कारवाई दररोज होणार असून, पहिल्यांदा कमी दंड आकारणी झाली आहे, मात्र सदर व्यक्ती किंवा आस्थापने पुन्हा पुन्हा नियम धाब्यावर बसवत असल्याचे निदर्शनास आल्यास दंडाची रक्कम नगरपालिका परिपत्रकानुसार वाढीव स्वरूपात वसूल केली जाईल, असे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सांगितले आहे. यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहे.