शरद पवार यांच्याकडून पुन्हा समर्थन
पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जेव्हा तणावपूर्ण प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच पाहिजेत, असे पवार यांनी सांगितले.
यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. गलवान खोर्यात भारतीय सैनिक निशस्त्र का गेले, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आक्षेप पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत खोडून काढला होता. भारताला आंतरराष्ट्रीय कराराचे पालन करावे लागत असल्याचे पवार यांनी म्हटले होते तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. 1962च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावलेला 45 हजार चौकिमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार झाला पाहिजे, असेही पवार म्हणाले होते. यानंतर आता पुन्हा त्यांनी मोदींच्या कृतीचे समर्थन केले आहे.