अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालवधी होऊन गेला. वीजपुरवठा सुरळीत होण्याची 7 जुलै ही डेडलाइन होती, मात्र आजही श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील 90 गावे अंधारातच आहे. इतर काही ठिकाणीही समस्या आहेत. पाऊस आणि मजुरांची कमतरता यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी या गावांना अंधारातच काढावे लागणार आहेत.
चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, मुरूड, पाली, माणगाव, तळा, पोलादपूर, महाड, गोरेगाव, श्रीवर्धन, म्हसळा, पनवेल ग्रामीण, कर्जत, खोपोली व खालापूर या भागात चार उपकेंद्र आणि 32 उपकेंद्र बंद पडली. 6773 रोहित्रांमध्ये बिघाड झाला. उच्चदाबाचे 5507 खांब व लघुदाबाचे 11089 खांब जमीनदोस्त झाले. 261 फिडरमध्ये बिघाड झाला आणि 1976 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सहा लाख 38 हजार 859 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा यामुळे बाधित झाला. यातील पाच लाख 80 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, मात्र 90 गावांमधील 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही.
वादळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर
जिल्ह्यात 1713 पक्की घरे व 687 झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या. एक लाख 81 हजार 22 घरांचे अंशतः नुकसान झाले. या सर्वांना मदत वाटप करण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना, जखमींना मदत देण्यात आली आहे. शेतीचे नुकसान झालेल्यांना मदत देण्यात आली आहे, मात्र आजही काही ठिकाणी मदत पोहोचलेली नाही. दुसरीकडे चक्रीवादळात मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. त्यांना देऊ केलेली मदत अपुरी आहे. दरम्यान, मच्छिमारांना वाढीव मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यांचे प्रस्तावदेखील राज्य शासनाला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 1976 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. मागील काही दिवस प्रचंड पाऊस पडत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कामगार, मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कामास विलंब होत आहे. लवकरच सर्व गावांमधील वीजपुरवठा सुरळीत होईल.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड
दुसर्या विभागातून आलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना कोकणातील हवामान सहन होत नसल्याने त्यातील बहुतांश अभियंते, कर्मचारी परत गेले आहेत. आता स्थानिकांच्या मदतीनेच महावितरणचे काम सुरू आहे. जिल्हाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकार्यांनाच विचारून माहिती दिली होती, पण पावसाचा व्यत्यय, कर्मचार्यांचा तुटवडा यामुळे हे काम लांबत आहे.
-ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण