कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार
भाजपचे कळंबोली सरचिटणीस आणि माथाडी कामगारांचे नेते राजेंद्र दादू बनकर यांचे बुधवारी (दि. 8) पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजूशेठ यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र बनकर यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटायला लागल्याने खांदा कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य तपासणीत त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळताच त्यांच्यामार्फत बनकर यांना सोमवारी पनवेल येथील पॅनासिया हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
राजूशेठ यांच्या पार्थिवावर पनवेलमधील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नगरसेवक अमर पाटील तसेच रवींद्र भगत, अशोक मोटे, बबन बारगजे, प्रकाश शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेंद्र बनकर हे मूळचे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील रहिवासी. त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय होता. राजकीय व सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यामुळे राजूशेठ म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते. कोरोनाच्या काळातही त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper