माहितीच्या महास्फोटाच्या या युगातच कोरोना महामारीचे अभूतपूर्व संकट जगभरातील सर्वसामान्य अनुभवत आहेत. हे सारे काय घडते आहे, हे कधी संपणार हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच डोक्यात गेले काही महिने सतत घोंघावत आहेत. यातून दिसणार्या अनिश्चिततेतून निर्माण होते ती फक्त ताणयुक्त हतबलतेची स्थिती. या सार्यात आता लशीच्या संशोधनावर अवघ्या आशा एकवटलेल्या असताना त्यासंदर्भात मोठे आंतरराष्ट्रीय राजकारण खेळले जाणे स्वाभाविक आहे.
कोरोना काळात मुळातच सगळीकडे स्थिती बिकट असताना या महामारीसंबंधातील कथित कारस्थानांच्या कथांनी सर्वसामान्यांची मती आणखीनच कुंठीत होते. कधी कधी या कारस्थान कथांच्या जोडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीही सर्वसामान्य माणसांमधील हतबलतेची भावना अधिकच तीव्र करतात. रशियाने चोरले कोरोना लशीचे संशोधन ही अशीच एक बातमी म्हणता येईल. दोन-चार दिवसांपूर्वीच रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने आपली कोरोना व्हायरसवरील लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. परंतु त्यानंतर लगेचच रशियन सरकारचे हस्तक असलेले हॅकर्स ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधील औषध कंपन्या तसेच उच्चशिक्षण संस्थांमध्ये सुरु असलेले कोविड-19 वरील लशीचे संशोधन पळवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप ब्रिटनच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राकडून करण्यात आला. या आरोपाला अमेरिका व कॅनडाच्या सुरक्षा सल्लागारांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अर्थातच रशियाने मात्र हे आरोप फेटाळले असून हॅकर्सच्या या गटांशी रशियाचे काहीही देणेघेणे नसल्याचे म्हटले आहे. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा यांच्या दाव्यानुसार ‘एपीटी 29’ या हॅकर्स ग्रुपने ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर सायबर हल्ले करुन लशीच्या संशोधनासंबंधातील महत्वाची माहिती चोरली. हा हॅकर्स गट रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा भागच असल्याचे अमेरिकेने यापूर्वीही म्हटले आहे. यासंदर्भातील आरोप-प्रत्यारोप यापुढेही सुरुच राहतील अशी चिन्हे दिसत असून कोरोना महामारीसदृश्य जागतिक संकट यापुर्वी न अनुभवलेल्या सर्वसामान्यांना मात्र हे सारे अधिकच चिंतेत टाकणारे ठरणार आहे. येत्या सोमवारी ब्रिटनच्या बहुचर्चित ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 लशीचे अहवाल प्रकाशित होणार आहेत. त्याआधीच रशियन लस संशोधनाच्या विरोधात हे आरोप संयुक्तपणे केले गेले आहेत याकडेही काही वृत्तांमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे. आपल्या लशीच्या वीस कोटी डोसांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे रशियाने यापूर्वी म्हटले आहे. अफाट आर्थिक गुंतवणूक असलेल्या लशी बाजारात पोहचेपर्यंत बरेच दावे-प्रतिदावे होतच राहणार. सध्याच्या माहितीच्या महास्फोटाच्या युगात नेमकी आणि सत्य माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे हे एक आव्हानच होऊन बसले आहे. कोरोना महामारीसंदर्भात यापूर्वी अनेक उलटसुलट कारस्थान कथा मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर चघळल्या गेल्या आहेत. कोरोना हे चीनच्या वुहान प्रांतातील प्रयोगशाळेत तयार केले गेलेले जैविक अस्र आहे इथपासून ते हा घातक विषाणू म्हणजे फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आहे इथपर्यंत अनेक उलटसुलट कारस्थान कथांनी आधीच गोंधळलेल्या सर्वसामान्यांना अधिकच पेचात टाकले. अमेरिकेसारख्या देशातही याचा जनमानसावर मोठा परिणाम होऊन मास्क घालण्याची आवश्यकता न वाटणे किंवा एकंदरच कोरोना महामारी हेच थोतांड वाटणे इतपत प्रभाव दिसून येतो आहे. हॅकर्सकडून संशोधन चोरीसारख्या बातम्यांमधून आणखी नव्या ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ जन्माला आल्या तर आश्चर्य वाटणार नाही.