Breaking News

महाडमध्ये शांतता समितीची बैठक

महाड : प्रतिनिधी

ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून येथील तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाची तयारी आणि लोकांनी मांडलेल्या सूचना यावर चर्चा करण्यात आली.

महाडमध्ये 19 आणि 20 मार्च रोजी चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्ष साजरा होत आहे. याकरिता संपूर्ण राज्यभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने महाडमध्ये येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणारी तयारी आणि लोकांच्या सूचना यावर महाड तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाड तहसीलदार चंद्रसेन पवार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सणस, नगर परिषद  मुख्याधिकारी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडून प्रतिवर्षी केल्या जाणार्‍या सोयी सुविधांबाबत माहिती देण्यात आली. महाडमध्ये येणार्‍या भीमसैनिकांची पिण्याच्या पाण्याची, वाहतुकीची गैरसोय होवू नये म्हणून नगर परिषद आणि  एसटी आगारामार्फत अधिक यंत्रणा राबवण्यात येणार आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार केंद्र उभी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जगताप यांनी दिली.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते मधुकर गायकवाड, मोहन खांबे, सखाराम सकपाळ, दीपक गायकवाड, केशव हाटे, तुळशीराम जाधव, लक्ष्मण जाधव, नागेश जाधव आदींनी  चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त महाडमध्ये येणार्‍या भिमसैनिकांना जाणवणार्‍या गैरसोयी प्रशासनासमोर मांडल्या. याबाबत त्वरित कार्यवाही करून उपाययोजना आखण्याचे आश्वासन तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply