![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/07/mask_handwash3-1024x538.jpg)
सतत कोरोनाच्या बातम्या ऐकून, वाचून, पाहून अनेकांना ताणाचा अनुभव येतो आहे. येणारच. स्वाभाविकच आहे ते. मग कसा टाळायचा हा ताण? वर्तमानपत्रे टाळली, न्यूज चॅनल्स टाळले तरी आपल्या आसपासच्या घडामोडी समाजमाध्यमांवरही येतातच सामोर्या. मग कशी राखायची सकारात्मकता? सद्यस्थितीची आवश्यक तेवढी माहिती करून घेऊन सकारात्मकतेने आजच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी थोडासा नियोजनपूर्वक प्रयास हवा.
कोरोना आपल्या जगण्याचा भाग बनून जवळपास अर्धे वर्ष उलटले आहे. खरे तर यातला आत्यंतिक आव्हानात्मक कालखंड मागे पडला आहे असा सकारात्मक विचारही करता येईल. प्रारंभी अगदी तज्ज्ञांनाही कोरोना ही नेमकी काय भानगड आहे याची माहिती नव्हती. तिथून एव्हाना जगभरातील मानव जमातीने बरीच प्रगती केली आहे असे म्हणायला वाव आहे. अजूनही आपल्याला या घातक विषाणूबद्दल नित्य नवी माहिती कळत असली तरी आता याचा गंभीर स्वरुपाचा संसर्ग होण्यासाठी नेमक्या किती प्रमाणात व्हायरस पार्टिकल्स लागतील याची आकडेवारीही तज्ज्ञ मांडू लागले आहेत. अर्थात, सर्वसामान्यांना या माहितीने थोडाफार दिलासा मिळाला असला तरी जोवर जगणे काही अंशी तरी पूर्ववत होत नाही तोवर निराशेचे ढग अधूनमधून झाकोळत राहणारच. त्यातच अनेकांना या महामारीमुळे मोठ्या आर्थिक परिणामांना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळेच या संकट काळात खंबीर राहणे, नैराश्य टाळणे हे सोपे नाही. पण त्याचवेळेस हेही ध्यानात घेतले पाहिजे की मानवजमातीला सामोरे आलेले हे काही पहिलेवहिले भीषण संकट नव्हे. अगदी आपल्या घरातल्या, कुटुंबातल्या ज्येष्ठांकडून आपल्यापैकी अनेकांनी दुष्काळात, पुरात तग धरल्याच्या आठवणी ऐकल्या असतील. शहराकडे धाव घेऊन काबाडकष्टाने नव्याने संसार कसा उभारला याच्या त्यांच्या आठवणी तरुणांना निश्चितच उमेद देऊन जातील. संघर्ष हा मानवी जीवनाचा भाग कायमच राहिला आहे. आपापल्या हिश्शाचा संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. यात कधी पुरती दमछाक होते तर कधी नाऊमेद व्हायला होते. अशावेळेस शून्यातून विश्व उभारणार्या, दैन्यावस्थेतही सदोदित प्रसन्न राहणार्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना आठवणे दिलासा देऊ शकते. अनेकांच्या लहान-मोठ्या योजना कोरोनामुळे कोलमडल्या असतील. कुणाला काही आनंदसोहळे रद्द करावे लागले असतील. पण अशा काळात काय गमावले याचाच विचार करत राहण्यापेक्षा आजवर आपल्या हाती काय लागले आहे, कशा-कशाबद्दल आपल्याला खरोखरीच कृतज्ञता वाटली पाहिजे याचा विचार अवश्य करावा. आणि सतत गंभीर राहण्यापेक्षा छोट्या-छोट्या आनंदांमध्ये जरुर रमावे. हसण्या-हसवण्याला दिनक्रमात अवश्य जागा करावी. अगदी साधी भेळ सुद्धा सगळ्यांनी मिळून गप्पा करीत हसतखेळत खाल्ली तर मोठा आनंद देऊन जाते. मित्रमंडळींसोबतची साधीशी पावसाळी सहलही एखाद्या पर्यटन स्थळाला दिलेल्या खर्चिक भेटीपेक्षा अधिक अविस्मरणीय असते. तेव्हा अधूनमधून अशा सहज आनंद देऊन गेलेल्या गोष्टी आठवाव्यात. आपल्याला भावणार्या पण एरव्हीच्या रहाटगाडग्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी कदाचित या संकटकाळात शक्य असू शकतील. आपल्याला एकटे वाटत असेल तर दुसर्या एखाद्या एकाकी जीवाला सोबत करावी म्हणजे आपला प्रश्न आपोआप सुटतो असे म्हणतात. या संकट काळातही अनेक जण इतरांच्या मदतीला धावून जात आहेत. अनेक छोट्या-छोट्या मार्गांनी हे करता येईल आणि त्यातून ताण नक्कीच हलका होऊ शकेल.