कामोठ्यातील महिला मंचकडून सैनिकांना राख्या
पनवेल : प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर त्वेषाने लढतात. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य वाढावे तसेच नागरिकांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी कामोठे येथील दिशा महिला मंच व्यासपीठातील महिलांनी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राख्या तयार करून त्या व शुभेच्छापत्र सैनिकांना पोस्टाद्वारे पंजाबमधील जालंधर येथे पाठविण्यात आली आहेत. एक धागा शौर्याचा, एक धागा रक्षणाचा असे या उपक्रमाचे नाव आहे.
‘महिलांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या शौर्याचे व त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून नागरिकांनाही मिळेल. सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिशा महिला मंच व्यासपीठातील महिलांनी राख्या तयार करण्याचे ठरवले. लॉकडाऊनमुळे प्रत्येकीने आपल्या घरातच राख्या बनवून पंजाबच्या जालंधरमधील 267 इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या 800 सैनिकासाठी शुभेच्छापत्रांसह पोस्टाद्वारे पाठवल्या’, अशी माहिती मंचच्या अध्यक्ष नीलम आंधळे यांनी दिली.
या राख्या तयार करण्यासाठी विद्या मोहिते, रेखा ठाकूर, खुशी सावर्डेकर, अनुप्रिता महाले, गीतांजली नायकोडी, भावना सरदेसाई, रीना पवार, दिपाली कपोते, सुरेखा आडे, शालू पांडे, अनुजा मस्के, सुवर्णा टेंगळे, अर्चना मसणे, रोशनी ओरपे, उज्ज्वला शिंदे, कविता पाखरे, शिल्पा चौधरी, श्रुती शिंदे, विभावरी शिगवण, जयश्री झा, प्रमिला झिंजाड, स्वप्नाली दोशी, वैशाली जुमडे, मनीषा शिंदे, सारिका माळी, सत्या काळे, विद्या वायकर, रुपाली होडगे या महिलांनी सहकार्य केले आहे.