पाली भूतीवली परिसरातील आदिवासी तहानलेलेच; जमिनी कोरड्या



कर्जत : बातमीदार
तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासनाने पाली भूतीवली धरणाची निर्मिती केली आहे. या धरणामध्ये 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत आहे. मात्र शेतीसाठी पाणी पुरविण्याकरीता पाटबंधारे विभागाने कालवेच बांधले नसल्याने या धरणाच्या पाण्यावर शेती केली जात नाही. दरम्यान, धरणात पडून असलेले पाणी तेथील बिल्डर अनेक वर्षे वापरत असून, त्यावर कोणचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
तीन गावे स्थलांतरित करून पाली भूतीवली धरण उभारण्यात आले असून, परिसरातील 15 गावामधील 1100 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी हे धरण बांधले गेले. 1992 मध्ये धरणाच्या कामाला सुरूवात झाली आणि धरणाची मुख्य भिंत 2004 मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. मात्र धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता आजातागत कालवे बांधण्यात आले नाहीत. पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा तसेच उजवा आणि डावा असे 15 किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पुर्ण झाले नाहीत. परिणामी शेतीसाठी पाणी सोडता येत नाही, अशी भूमिका पाटबंधारे खाते घेत असते.
प्रामुख्याने शेतीसाठी पाणी मिळावे, याकरीता या पाली भूतीवली धरणाची निर्मिती करण्यात आली होती. पण हा उद्देश कागदावरच राहिला असून, धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून त्याद्वारे पाणी उचलले जात असून त्यावर पाटबंधारे खात्याचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कारण तेथील एका बिल्डरला पाणी देण्याचा पाटबंधारे खात्याने केलेला करार डिसेंबर 2016 मध्ये संपला आहे, असे असतानाही धरणातील जलाशयातून पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यावेळी धरणाच्या समोर असलेल्या आणि धरण ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे, त्या ग्रामपंचायतीमधील सर्व वाड्यांना साधे पिण्याचे पाणी नाही. मात्र बिल्डर लॉबीने त्या त्या ठिकाणी बांधलेले स्विमिंग पूल पाण्याने भरले असल्याचे विदारक चित्र पाली भूतीवली धरण परिसरात आहे. पाली भूतीवली धरणातील पाणी बिल्डर लॉबीला देवून, पाटबंधारे विभाग धरण परिसरातील तहानलेल्या आदिवासी लोकांच्या जीवनाशी खेळण्याचे काम करीत आहे. त्याचवेळी जमिनी देऊनही कालवे काढण्यात येत नसल्याबद्दल स्थानिकांनी पाटबंधारे खात्याला जबाबदार धरले आहे. पाली भूतीवली धरणात बिल्डरसाठी पाणी शिल्लक रहावे, या करीताच पाटबंधारे विभाग शेतीला पाणी सोडण्यासाठी कालवे बांधत नसल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहेत.
धरणातील पाणी देण्याबाबतचे सर्व अधिकार कोलाड विभागीय कार्यालयाला असून, तेथून कोणालाही पाणी देण्याचे निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे सध्या खाजगी संस्थेला धरणातून पाणीपुरवठा सुरु असल्याबद्दल तत्काळ चौकशी केली जाईल. कालव्यांची कामे करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे केली आहे, निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कालव्यांच्या कामांना सुरुवात होईल.
-पी. सी. रोकडे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, कोलाड
पाली भूतीवली धरणाच्या कामाला गती मिळावी म्हणून आपण प्रयत्न केले आहेत. प्रामुख्याने शेतीसाठी पाणी मिळावे, या हेतुने धरणाची उभारणी झाली आहे, तो उद्देश सफल करण्यासाठी आपला शासन दरबारी पाठपुरावा सुरू राहील. कालवे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत.
-देवेंद्र साटम, माजी आमदार, कर्जत-खालापूर