Breaking News

पनवेल मनपातर्फे अँटीजेन टेस्ट; खारघर केंद्रात सुविधा

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी पनवेल महापालिकेने खारघरमधील नागरी आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट चाचणी सुरू केली आहे. या चाचणीनंतर अवघ्या 30 मिनिटांत रुग्णास अहवाल प्राप्त होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

खारघर आणि तळोजा परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत खारघरमध्ये 976, तर तळोजा परिसरात 281 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. खारघरच्या 654 आणि तळोजामधील 178 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे, तसेच दोन्ही नोडमध्ये 21 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत खारघरमध्ये कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने आणि कोरोनाच्या चाचणीसाठी खारघरच्या बाहेर जावे लागत असल्यामुळे 20 जुलैपासून पालिकेच्या खारघर सेक्टर 12मध्ये असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात अँटीजन टेस्ट किटचा उपयोग केला जात आहे. याद्वारे तपासणी केल्यास वेळेत अहवाल प्राप्त होत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण खारघर सेक्टर 12मधील नागरी आरोग्य केंद्रात जात असत तेव्हा डॉक्टर तपासणी करून त्यांना कोरोनाच्या टेस्टसाठी इंडिया बुल्स अथवा पालिकेच्या पनवेल येथील रुग्णालयात पाठवत, तसेच अहवालासाठी दोन ते तीन दिवस थांबावे लागत असे. आता खारघरमध्ये कोरोना टेस्ट आणि 30 मिनिटांत अहवाल प्राप्त होत आहे.

-प्रवीण पाटील, स्थायी समिती सभापती, पनवेल महापालिका

खारघरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिकेच्या माध्यमातून अँटीजेन टेस्टद्वारे 30 मिनिटांत रुग्णाचा अहवाल प्राप्त होतो. सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत रुग्णाची तपासणी केली जात आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठविले जाते.

-डॉ. पंकज टिटार, वैद्यकीय अधिकारी, खारघर

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply