शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
औरंगाबाद : प्रतिनिधी
देशात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघे औरंगाबाद दौर्यावर होते. त्या वेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात मुंबईपेक्षाही चिंताजनक स्थिती डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वैद्यकीय सेवा वाढवणे या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. पावसाळ्याच्या दृष्टीने आणखी काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरे जावे, असे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे आवाहन केले आहे. सगळ्यांनी मिळून जर आपण या संकटाविरोधात लढलो तर हे संकट दूर होईल, असा विश्वासही पवार यांनी या वेळी व्यक्त केला.