उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मावळ : प्रतिनिधी
शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना रविवारी (दि. 20) संबोधित केले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबतही भाष्य केले. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहचवून एमआयएमचा कट उधळून लावा. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मावळमधील इंदूरी येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीला उपस्थिती लावली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाष्य केले. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत नाहीत. ते अजान स्पर्धा भरवणार, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार आणि त्यांचे घटक पक्ष हे एमआयएमसोबत जाण्याचा विचार करीत आहेत. त्या वेळेस आरोपही करणार तेच. ही सगळी मिली जुली कुस्ती आहे. सगळे मिळून खेळत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
जे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी मावळात येऊन बैलगाडा शर्यत येऊन पहावी. या शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून मी एक कमिटी स्थापन केली. त्यांनी बैल धावणारा प्राणी आहे हे त्यातून सिद्ध करून दाखवले. हाच अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला, तेव्हा ही शर्यत झाली. मला आज आनंद आहे माझा बैलगाडा इथे धावला, पहिला नंबरही आला. 2014 आणि 2019मध्येही जनतेने आम्हाला पहिले आणले, पण काहींनी शाळा केली. मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला तो कधी मागे हटत नाही, असेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.
शिवसेना दिशाहीन -ना.नारायण राणे
जामनेर ः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला तत्त्व किंवा धोरण नाही. दिशाहीन पक्ष म्हणजे शिवसेना, अशी टीका केंद्रीय मंत्री राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.