हैदराबाद ः वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलला रविवारी (दि. 9) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून यात सात रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 30 जणांना वाचविण्यात यश आले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
आग लागली त्या वेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरित कोविड केअर सेंटरमध्ये 30 रुग्ण व 10 वैद्यकीय कर्मचारी होते. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. हॉटेलमध्ये प्रचंड प्रमाणात धूर पसरल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. 17 रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचार्यांनी जीव वाचविण्यासाठी दुसर्या व तिसर्या मजल्यावरून उड्या टाकल्या. एनडीआरएफच्या कर्मचार्यांनी पीपीई किट घालून मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले. कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येथे भीषण आग लागली. प्राथमिक चौकशीतून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे कळते, मात्र याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.