नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने प्रतिवार्षिक श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा झाला. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा कोकण प्रांताच्या फेसबुक पेजवर ऑनलाइन स्वरुपात झाला. यानिमित्ताने नवीन पनवेल शाखेने ’कृष्णसखा’ या कार्यक्रमाची निर्मिती केली.
’कृष्णसखा’ या संकल्पनेतून निर्मिलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कृष्णगीते, रांगोळी, चित्रकला, शास्त्रीय नृत्य, कृष्णकथा कीर्तन आदी कलाप्रकारांचा समावेश होता. या कार्यक्रमात नवीन पनवेल परिसरातील अनेक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
संस्थेच्या कोषाध्यक्ष अनुराधा ओगले आणि नाट्य अभिनेत्री प्रज्ञा पेंडसे यांनी बहारदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. अमोघ ओगले याने उत्कृष्ठ तंत्रसहाय्याने कार्यक्रम सुशोभित केला. संस्थेच्या नवीन पनवेल अध्यक्ष उमा जोशी, सचीव वर्षा मेहेन्दर्गे, सहसचीव निलिमा देशपांडे आदींनी हा सोहळा संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
जन्माष्टमीचा कार्यक्रम संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने आश्रमशाळा, दुर्गम भागातील वस्त्यांमधील लहान मुलांसोबत साजरा केला जातो. परंतु यंदा कोरानामुळे ऑनलाइन माध्यमातून अनोख्या पद्धतीने हा सोहळा झाला. यातून अनेक कलाकाराना व्यासपीठ उपलब्ध करून देता आले.
-उमा जोशी, अध्यक्ष, संस्कार भारती, नवीन पनवेल शाखा