Breaking News

पनवेल महापालिकेची प्रथमच ऑनलाइन महासभा

रस्ते रुंदीकरणाला मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) प्रथमच ऑनलाइन झाली. या सभेत शहरातील रस्ते रुंदीकरणाला महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते लवकरच मोकळा श्वास घेताना दिसतील, शिवाय स्वच्छताही दिसणार आहे.
पनवेल महापालिकची सर्वसाधारण महासभा कोविड-19मुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पनवेल महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे महासभा घेण्यात आली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सभेला सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, तेजस कांडपिळे, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त शिंदे उपस्थित होते .
या सभेत 18 फेब्रुवारीच्या सभेत स्थगित ठेवलेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील मंजूर विकास योजनेतील राम गणेश गडकरी मार्ग, कापड बाजार मार्ग, महात्मा फुले मार्ग आणि लोकमान्य टिळक मार्ग 9.15 मीटर रुंदीकरण भूसंपादनाच्या खर्चाला मंजुरी देण्याच्या विषयावर चर्चा झाली व त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी भविष्यात कमी होणार आहे. याशिवाय या भागात स्वच्छता वाहनांना जाण्यासाठी होणारी अडचण कमी झाल्यावर तेथे स्वच्छता करणे सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध 12 ठिकाणी शौचालये चालवण्याकरिता संस्थेची नेमणूक करण्यास या वेळी परवानगी देण्यात आली.
या सभेत पनवेल महापालिका महापौर सहाय्यता निधी पनवेल जिल्हा-रायगड या नावाचा न्यास स्थापन करून त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली. सभागृह नेत्यांचे दोन महिन्यांचे व विरोधी पक्षनेत्यांचे एक महिन्याचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्यास मंजुरी देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्यासाठी निवास्थान बांधणे, खारघर नोड नो हॉकिंग झोन करणे तसेच पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतनाचे सापेक्ष ठोक मानधन आणि कोविड-19 सेवेत असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांना प्रतीदिन 300 रुपये भत्ता देण्याचा निर्णय पुढील सभेत चर्चा करून घेण्याचे ठरले.
कोविड-19 विषयावर चर्चा
सभेच्या सुरुवातीला कोविड-19 विषयावर चर्चा  झाली. अनेक नगरसेवकांनी आपल्याला आलेले अनुभव सांगून खासगी रुग्णालये आणि तेथील व्यवस्थेवर टीका केली. त्या ठिकाणी कशा प्रकारे रुग्णांना लुटले जात आहे याचे वर्णन माजी उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे आदी सदस्यांनी केले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बॅक्वेट हॉल येथे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार होते त्याचे काय झाले? सुरू झाले असल्यास माहिती का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला याशिवाय प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये फलक लावून त्यावर चुकीचे बिल दिल्यास कोणाशी संपर्क साधावा असा सवाल करून त्याचा मोबाइल नंबर देण्यात यावा, अशी मागणी केली. आयुक्तांनी हे हॉस्पिटल सुरू झाले असून, माहिती न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येक रुग्णालयातील संपर्क अधिकार्‍यांचे मोबाइल नंबर सगळ्यांना देण्यात येतील, असेही सांगितले. या वेळी त्यांनी खासगी रुग्णालयांवर कारवाई केल्यावर ते उच्च न्यायालयात दावा दाखल करीत असल्याची माहिती दिली. सुयस्थ रुग्णालयाने सात कोटींचा दावा केल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ऑनलाइन घेण्यात आली. ती अपेक्षापेक्षा चांगल्या प्रकारे झाली. अनेक नगरसेवक त्यामध्ये सहभागी झाले. सभा समाधानकारक झाली, पण काही वेळा नेटच्या प्रॉब्लेममुळे आवाज येत नव्हता. त्यामुळे पुढील सभा ऑफलाइन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– डॉ. कविता चौतमोल, महापौर

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply