Breaking News

‘जिथे यंत्रणा पोहचणार नाही, तिथेही मदत करणार’

अकोला ः प्रतिनिधी

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भ, कोकणासह राज्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. या वेळी अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेेश दिले, तसेच जिथे यंत्रणा पोहचू शकत नाही, तिथेही मदत देणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

निवडणुकीच्या आणि दिवाळीच्या धामधुमीत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्याच्या अनेक भागांत शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष यांसह अनेक पिके भुईसपाट झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागांचा दौरा करीत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची रविवारी पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. त्यानंतर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. आता निवडणुका झाल्या असून, शेतकर्‍यांना मदत करण्याचे काम केले जाणार आहे. जिथे सरकारी यंत्रणा पोहचू शकत नाही, तिथेही मदत करणार आहोत. त्यामुळे फोटो असला तरी तो पंचनामा समजून मदत केली जाईल. ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई मिळालीच पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply