जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन
खालापूर : प्रतिनिधी
पेण अर्बन बँकेचे ठेवीदार आपले पैसे मिळविण्यासाठी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून घोटाळ्याविरोधात अविरत लढा देत आहेत, पण उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने या ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आहे. शासन व प्रशासन अजून किती अंत पाहणार याचा जाब विचारण्यासाठी 7 सप्टेंबरपासून ठेवीदार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. संघर्ष समितीच्या खोपोलीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पेण अर्बन ठेवीदार संघर्ष समितीची बैठक नुकतीच खोपोलीतील ब्राम्हण सभागृहात झाली. या सभेस संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, सचिव चिंतामण पाटील, नगरसेवक सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिरीष बिवरे यांच्यासह सर्व शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठेवीदारांच्या याचिकांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश-निर्देशांचे पालन संबंधित अधिकारी करीत नसून, बँक बुडविणार्यांंच्या बचावाचे काम करून ठेवीदारांना फसवित असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. यामुळेच आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष कृती समितीच्या माध्यमातून कर्जवसुली करून ठेवीदारांचे पैसे परत करा असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असताना फक्त पाच कोटींची वसुली करण्यात आली असल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली. संचालक मंडळातील सदस्य पक्षप्रवेश करून आपला बचाव करीत असल्याचा आरोपही त्यांनी संतोष शुंगारपुरे यांचे नाव घेऊन केला.
पेण अर्बन ठेवीदार संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे नगरसेवक सुनील पाटील यांनी सांगितले, तर ठेवीदार 10 वर्षांपासून आपले पैसे मिळविण्यासाठी लढत असताना शासनाने व पालकमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी शिरीष बिवरे यांनी केली.