नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात सहा गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला. यूपीने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद 158 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते. मधल्या फळीतील आदित्य तरेचे नाबाद शतक (118) आणि कर्णधार पृथ्वी शॉची आक्रमक अर्धशतकी (73) खेळी याच्या जोरावर मुंबईने हा सामना 41.1 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात जिंकला. मुंबईचे हे चौथे विजेतेपद ठरले. अंतिम सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार बाद 312 धावांचा डोंगर उभा केला. माधव कौशिक याने 156 चेंडूंत 15 चौकार व चार षटकारांसह 158 धावा केल्या. यानंतर समर्थ सिंग (55) आणि अक्षदीप नाथ (55) यांच्या अर्धशतकाने या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. मुंबईकडून तनुषने सर्वाधिक दोन गडी बाद केले, तर प्रशांत सोळंकीने एक गडी टिपला. उत्तर प्रदेशने विजयासाठी दिलेल्या 313 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी 9.1 षटकांत 89 धावांची तुफांनी सलामी दिली. यानंतर आदित्य तरेने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.