नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील 2503 हेक्टर बागायत क्षेत्रापैकी 794 हेक्टर म्हणजेच जवळजवळ 32 टक्के बागायत क्षेत्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट पाहावी लागणार आहे. उंच माडाची झाडे कोसळल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नारळाचे बहुतांशी झाप पडल्याने फळधारणा होण्यासाठी झापांची जाळी तयार होईपर्यंत थांबावे लागणार आहे.
माडी व्यवसाय करणार्यांवरही संक्रांत आली असून 10पैकी दोन ते तीन झाडेच माडी काढण्यायोग्य राहिली आहेत. आधारासाठी माडावर पुरेसे झाप नसतील तर माडी निघत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. रायगड जिल्ह्यातील कित्ते भंडारी समाजाचा प्रमुख व्यवसाय माडीवर असून वेगाने सुटलेल्या वार्याने माडाची झापे उडून नेल्याने नारळाचे झाड बोडके झाले. परिणामी हे झाड आता माडी देणे बंद झाल्याने माडीचा तुटवडा निर्माण झाला. निसर्ग चक्रीवादळात नारळ व सुपारीची अनेक झाडे पडल्याने या भागात नारळाचा तुटवडा निर्माण झाल्याने आता चढ्या किमतीने नारळविक्री होत आहे. सुपारीचीही अनेक झाडे पडल्याने सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे.
20 टक्केआंबा बागायत लागवड 50 वर्षांहून अधिक जुनी असल्याने या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तौलनिकदृष्ट्या सुपारीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद आहे. नवीन बागायत तयार व्हायला किमान 10 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. आंब्यापासून सरासरी 10 हजार, नारळापासून दोन हजार, तर सुपारीपासून एक हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. बागायतदारांचे एकूण क्षेत्रापैकी 32 टक्के क्षेत्र चक्रीवादळामुळे बाधित झाले असून बळीराजाला नवीन लागवड केल्यापासून किमान 10 वर्षे उत्पन्न मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या संकटात अतिशय तुटपुंजे शासकीय अनुदान जाहीर झाल्याने शेतकर्यांत नाराजी दिसून येत आहे.