Breaking News

पुनश्च निर्बंध

गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोना महामारी काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सरला असे वाटत असतानाच हा विषाणू नवनवी रूपे घेऊन अधिक घातक पद्धतीने आक्रमण करीत आहे. आपल्या देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन-अनलॉकचा लपंडाव रंगताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने याच महिन्यात राज्य शासनाने पाच स्तरांत अनलॉक केला होता. त्यामुळे बहुतांश ठिकाणचे निर्बंध शिथिल झाले होते. जिल्हा किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या किती आहे, त्यावरून पाच गटांमध्ये विभागणी ठरवली जात होती. त्यानुसार ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील असा पहिला गट, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40च्या दरम्यान असेल तो दुसरा गट. पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असतील तो तिसरा गट, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्केदरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असतील तो चौथा गट आणि जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असतील असा पाचवा गट तयार होत होता. दर आठवड्याला स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्याचा किंवा महापालिकेचा गट ठरवला जाणार असल्याचे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते, मात्र आता यात सुधारणा करून बदल करण्यात आला आहे. याचे कारण राज्यात एकीकडे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असतानाच डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. राज्यातील रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक असून त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची संख्या काहीही असली तरी यापुढे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्‍या स्तरावरच असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे. याचाच अर्थ निर्बंध लागू होणार आहेत. स्थानिक प्रशासनाला आपापल्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या व दुसर्‍या लाटेनंतर आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. चिंताजनक बाब म्हणजे ही लाट पहिल्या दोन लाटांपेक्षा जास्त घातक असेल, अशी भीतीवजा शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महापालिकांचा समावेश तिसर्‍या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. त्यानुसार हे निर्बंध सोमवारपासून लागू होणार आहेत. त्याचा परिणाम एकूणच जनजीवनावर कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply