अलिबाग ः प्रतिनिधी
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 8) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षक परिषदेकडून आंदोलन, मोर्चे काढण्यात आले, मात्र अद्यापही शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाहीत. यासाठी राज्यभर जिल्हाधिकारी यांच्याकडे शिक्षक परिषदेकडून निवेदन देण्यात आले. अलिबागेत जिल्हाधिकार्यांना रायगड शाखेमार्फत निवेदन देण्यात आले. राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष राजेंद्र नाईक, कार्यवाह विजय पवार, संघटन मंत्री वैभव कांबळे, संचालक देवानंद गांगर आदी या वेळी उपस्थित होते.
1 नोव्हेंबर 2005नंतर सेवेत लागलेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सेवेत लागलेल्या कर्मचार्यांचा अपघाती मृत्यू झालेल्यांना 10 लाख विशेष आर्थिक मदत, 10 वर्षांची अट शिथिल, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित योजना लागू करा, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदे सेवाज्येष्ठतेने भरा, कोविडमध्ये कर्तव्य बजावताना मृत कर्मचार्यांच्या वारसांना 50 लाख विमा संरक्षण मिळावे, जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या विनंती बदल्या ऑनलाइन पद्धतीने कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.