Breaking News

लसींची स्पर्धा तीव्र

सुरक्षिततेच्या संदर्भात ज्या कंपन्या पारदर्शकपणे माहिती उपलब्ध करीत आहेत त्यांच्याबद्दलच जागतिक स्तरावर खात्री दिली जात आहे. यासंदर्भात अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस आघाडीवर राहिली आहे, तर रशियन लसीबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचा सूर लावला गेला आहे. आता यामागे खरोखरीच पाश्चिमात्य देशांचे काही राजकारण आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहेच.

भारतातील औषध महानियंत्रकांनी मंजुरी देऊन अवघी प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास नोव्हेंबर महिन्यातच रशियाने विकसित केलेली स्पुतनिक लस भारतात उपलब्ध होऊ शकेल, अशी मोठी घोषणा संबंधित रशियन कंपनीचे प्रमुख किरिल दिमित्रिव यांनी गुरुवारी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. रशियाने विकसित केलेल्या या लसीच्या सुरक्षिततेबद्दल याआधीही विशेषत: पाश्चात्य देशांकडून शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. आजही या लसीच्या साइड इफेक्ट्सच्या बातम्या येत आहेत, परंतु दिमित्रिव यांनी मात्र हा पाश्चात्य देशांचा नकारात्मक प्रचार असल्याचा आरोप केला. आता हे कितपत खरे की खोटे याची शहानिशा करूनच भारताला त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल हे निश्चित, पण डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज (डीआरएल) या भारतीय औषध कंपनीने रशियन लसीचे 10 कोटींपेक्षा जास्त डोस भारतात तयार केले जातील, अशी घोषणा बुधवारी करून खळबळ निश्चितच उडवून दिली आहे. डीआरएल कंपनीने या लसीकरिता रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडासोबत करार केला असून या फंडाचेच दिमित्रिव हे प्रमुख आहेत. भारतीय औषध नियंत्रकांकडून येत्या आठवडाभरात परवानगी मिळाल्यास भारतात या लसीच्या मानवी चाचण्या सुरू होतील, असे त्यांनी म्हटले आहे. लस उत्पादन क्षेत्रातील ही मोठी घडामोड मानली जात असून अमेरिकी कंपनी मॉडर्ना कोरोनावरील लसनिर्मितीच्या स्पर्धेत मागे पडल्याने तिचे शेअर कोसळण्याची भीती व्यक्त करीत शेअर बाजारातील तज्ज्ञांनी ते विकण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. लस उत्पादक कंपन्यांमधील स्पर्धा कमालीची तीव्र होऊ लागल्याची ही तर नुसती चाहूल आहे. गेल्याच आठवड्यात ब्रिटनमधील एका स्वयंसेवकामध्ये काही आजार दिसून आल्याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व अ‍ॅस्ट्राझेनेका निर्मित लसीच्या मानवी चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या, परंतु चौकशीअंती शंका दूर झाल्याने ही स्थगिती उठवण्यात आली. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने या लसीच्या उत्पादनाचे हक्क घेतले असल्यामुळे भारतातही या लसीबद्दल उत्सुकता आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी लस उपलब्ध करून देण्यावर दिलेला भर या सार्‍याची पार्श्वभूमीदेखील लसीसंदर्भातील स्पर्धेला लाभली आहे. भारत हा जागतिक स्तरावरील एक मोठा लस उत्पादक देश असल्यामुळे भारताकडेही संबंधितांचे लक्ष आहेच. दरम्यान, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांनाही आशादायक यश मिळाले आहे. बड्या विकसित देशांनी त्यांच्या लोकसंख्येच्या गरजेपेक्षा कितीतरी अधिक लसींची मागणी आधीच नोंदवून ठेवल्याने स्पर्धा आणखी तीव्र झाली असून विकसनशील व गरीब देशांपर्यंत लस कधी आणि कशी पोहचणार, हा प्रश्नदेखील आहेच. अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सर्व देशांना त्यांच्या-त्यांच्या तातडीच्या गरजेनुसार समान पातळीवर लसीचे वाटप व्हावे यासाठीचे प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply