कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी
वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था
भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ग्रेटर वाशिंग्टन डीसी, मेरीलॅन्ड, व्हर्जिनिया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेन्सिल्वेनिया, इंडियाना, ओहायो आणि नॉर्थ कॅरोलाइना या राज्यांतून आलेल्या शिख नागरिकांनी भारतातील नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात वाशिंग्टन डीसीमधील भारतीय दूतावासापर्यंत एका कार रॅलीचे आयोजन केले होत. त्यादरम्यान पोस्टर आणि बॅनर्ससोबत खलिस्तानी झेंडेही दिसत होते. अनेक बॅनर्सवर ’खलिस्तानी गणराज्य’ असे लिहिले होते. यातील काही खलिस्तानी समर्थकांनी राष्ट्रपिता गांधीजींच्या पुतळ्याची अवमानना केली. या वेळी भारताच्या विरोधात आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.
भारतीय दूतावासाकडून निषेध
भारतीय दूतावासाने या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रदर्शनाच्या पडद्याआड अशा प्रकारचे कृत्य करणार्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. अमेरिकन कायदा प्रवर्तन एजन्सीसमोर भारतीय दूतावासाने याबद्दल आपला तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. या घटनेचा तपास करावा आणि आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणीही भारतीय दूतावासाने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केली असून, याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे.