पर्यटकांसाठी ठरतेय आकर्षण; स्थानिक शेतकरी धास्तावले
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी येथे आठ रानगवे होते, परंतु नवीन आकडेवारीनुसार हीच संख्या आता 11च्या वर गेली आहे. यापेक्षाही अधिक रानगवे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जंगलाच्या चौफेर रानगवे दिसू लागल्याने पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत असून त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे, मात्र रानगवे काही प्रमाणात शेतीचे नुकसान करीत असल्याने शेतकर्यांसाठी ते डोकेदुखी ठरत आहेत.
फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीवांप्रमाणे अनेक सरपटणारे प्राणी व वनौषधी वृक्षांची धनसंपदाही मुबलक आहे. अभयारण्यात वन्य प्राण्यांत बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी, मोठी खार अर्थात शेकरू, बिबटे आदींचा समावेश आढळतो. सरपटणार्या प्राण्यांत नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सर्पांच्या जातीही आढळतात. जंगलात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. यासह आता फणसाड अभयारण्यात रानगवेही आढळले आहेत. म्हशीसारखे काळे, पायाखालील सफेद भाग तसेच त्यांच्या शेपटीला सफेद केस असतात.
याबाबत फणसाड अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सांगितले, जंगलातील सधनतेमुळे रानगवे येथे राहणे पसंत करतात. येथे पिण्याचे पाणीही मुबलक आहे. सुपेगावातील शेतकर्यांनी शेतीच्या नुकसानीची तक्रार प्रादेशिक वन विभागाकडे केली. त्याचा पंचनामा केला असून त्यांना लवकरच शासनाकडून भरपाई मिळेल. ही शेती रानगव्यांनी फस्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ऑक्टोबरपासून पर्यटकांचे आगमन होणार असून रानगवे त्यांचे आकर्षण ठरतील, मात्र रानगव्यांमुळे स्थानिक शेतकर्यांना धोका वाटतोय. शेतात पीक तयार झाले आहे. ही शेती रानगवे फस्त तर करणार नाहीत ना, अशी चिंता स्थानिक शेतकर्यांना सतावतेय. यासाठी जंगलानजीक राहणार्या शेतकर्यांना जागता पहारा द्यावा लागत आहे.