Breaking News

मोरबे धरणाला गळती

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील मोरबे धरणालाही अनेक ठिकाणी गळती लागल्याची तक्रार करूनही त्याकडे संबंधित अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. आता धरण भरल्याने ते ओसंडून वाहत असताना जास्त पाऊस पडल्यास तिवरेची पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले होते.

पनवेल शहरातून माथेरान रस्त्याने जाताना सुकापूरच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक फाटा जातो त्या रस्त्याने मोरबे धरणाकडे जाऊ शकतो.अनेक वर्षापूर्वी बांधलेल्या या धरणातील पाण्याचा वापर मुख्यतः शेती आणि भाजीपाला करण्यासाठी केला जातो. या धरणाला अनेक ठिकाणी तडे गेले असून त्यातून गळती होत आहे. याबाबत संबंधित खात्याकडे अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने या धरणाच्या कामासाठी 2 कोटी 96 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती रवींद्र पाटील यांनी दिली.

या धरणाच्या गळतीकडे अधिकार्‍यांनी लक्ष दिले नसल्याने आता दोन दिवसाच्या पावसाने धरण पूर्ण भरून ओसंडून वाहत असतानाही धरणाच्या भिंतीतून अनेक ठिकाणाहून पाणी गळती होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा दाब सहन न झाल्यास अनेक ठिकाणी छिद्र पडलेली धरणाची भिंत ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे झाल्यास मोरबे, तोंडले, वाकडी, खानाव, हरिग्राम, केनाळे आणि सुकापूर या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे येथेही अशी दुर्घटना घडण्याची शक्यता अनेक ग्रामस्थांनी यावेळी

व्यक्त केली. शनिवार-रविवार मोठ्या प्रमाणात सहलीसाठी या ठिकाणी पर्यटक येत असतात. अनेक तरुण मद्य पिऊन येथे दंगामस्ती करीत असतात. सुटीच्या दिवशी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचीही मागणी रवींद्र पाटील यांनी केली आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply