Breaking News

भारताने करून दाखवले

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या का होईना युद्धविरामाची घोषणा रशियाने केली. निश्चितपणे भारताने सातत्याने यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याचे योगदान यामागे आहे. ऑपरेशन गंगा आणखी काही दिवस सुरूच राहील. परंतु अन्य देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यात तथ्य निश्चितच आहे.

युक्रेनमधील युद्धग्रस्त शहरांमधून हजारो भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्याची मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहील हे स्पष्ट दिसते आहे. गेले काही दिवस रोजच्या रोज युक्रेनच्या सीमेलगतच्या अनेक विमानतळांवरून भारतीय विमाने या विद्यार्थ्यांना घेऊन भारताकडे उड्डाण करीत आहेत. हे आव्हान सोपे असणार नाही याची पूर्ण जाणीव असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरूवातीपासूनच या कामी जातीने लक्ष घातले. ऑपरेशन गंगाचा आराखडा तयार करण्यापासून या मोहिमेच्या अंमलबजावणीतील बारिकसारिक तपशीलांपर्यंत त्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घातले. त्यामुळेच राजनैतिक अधिकारी व दूतावासांशी संबंधित यंत्रणेवर हे काम सोपवून स्वस्थ न बसता मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना युक्रेनकडे रवाना केले व आजही हे चार मंत्री युक्रेनच्या सीमेलगतच्या परिसरात तळ ठोकून आहेत. विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रयासांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी जातीने संपर्क साधून त्यांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याची जबाबदारीही हे मंत्री पार पाडताना दिसतात. युक्रेनमधील भयावहरित्या चिघळत गेलेल्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी अकल्पित हालअपेष्टांना तोंड दिले आहे. विद्यार्थ्यांकरिता परिस्थिती जितकी बिकट आहे तितकीच त्यांच्या सुटकेकरिता धडपडणार्‍या भारतीय यंत्रणेसमोरील आव्हानेही बिकटच आहेत. तटस्थपणाची आपली राजनैतिक भूमिका कायम राखत भारताने हे आव्हान बर्‍यापैकी यशस्वीरित्या पेलले आहे. म्हणूनच रविवारी पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इतर देशांना जे जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे असे उद्गार काढले. एकीकडे काटेकोर नियोजनातून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे काम सुरू आहे व त्याचवेळेस या विद्यार्थ्यांशी भावनिकदृष्ट्या जोडले जाण्याची किमयाही साधली जाते आहे. हा पूर्णत: मोदी यांच्या कार्यशैलीचा प्रभाव आहे. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार हे पराकोटीचे प्रयत्न करत असताना देशातील विरोधक मात्र मोदींना लक्ष्य करण्याचे काम तेवढे करीत आले आहेत. या मोहिमेचे नाव ऑपरेशन गंगा कशासाठी, यातून उत्तर प्रदेशातील निवडणुकीत लाभ मिळवायचा आहे आदी टीका करताना, सरकार किती चोखपणे ही अत्यंत बिकट मोहीम पार पाडते आहे याची दखल घेण्याची गरज मात्र विरोधकांना वाटलेली नाही. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी उत्तम संपर्क ठेवून मोदी सरकार हे आव्हान पेलते आहे. त्याचवेळेला संयुक्त राष्ट्रांच्या बैठकांमध्ये आपली तटस्थपणाची भूमिका कायम ठेवण्याची तारेवरची कसरतही सरकारला पार पाडावी लागते आहे. एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करण्याचे हे शिवधनुष्य पेलणे शक्य झाले आहे ते निव्वळ मोदीजींच्या खंबीर नेतृत्वामुळेच. त्यामुळेच विरोधकांचा मोदीजींविषयीचा विखार पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मोदीविरोध हा एककलमी कार्यक्रम घेऊन विरोधकांनी कितीही आगपाखड केली तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. मोदींमुळे काय काय मुमकिन होते आहे याकडे जनतेचे नीट लक्ष आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply