रोहतांग ः वृत्तसंस्था
जगातील सर्वाधिक उंचीवर असणार्या सर्वांत मोठ्या अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, तर हिमालच प्रदेशातील कोट्यवधी लोकांचीही गेल्या कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली असल्याचे उद्गार काढले. पंतप्रधान मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेल्या 9.02 किमी लांबीच्या अटल बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी झाले आहे. विशेष म्हणजे भारताच्या युद्धनीतीविषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्त्वाचा भाग ठरणार असून, भारतीय लष्कराला आता पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते 2002मध्ये या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात आले होते, मात्र त्यानंतर आलेल्या सरकारने या कामाकडे दुर्लक्ष केले. परिस्थिती अशी होती की 2013-14पर्यंत फक्त 1300 मीटरपर्यंतच काम झाले होते. तज्ञ सांगतात, ज्या गतीने बोगद्याचे काम होत होते, ते पाहता 2040पर्यंतही काम पूर्ण झाले नसते. जर आज तुमचे वय 20 असेल तर त्यामध्ये अजून 20 जोडा. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला हा दिवस पहायला मिळाला असता, हे स्वप्न पूर्ण झाले असते. फक्त सहा महिन्यांत आम्ही बोगद्याचे 26 वर्षांचे काम पूर्ण केले.
जर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जायचे असेल, देशातील लोकांचा विकास व्हावा अशी इच्छा असेल तर वेग वाढवावा लागतोच असे सांगून, अटल बोगद्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …