मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फडणवीसांचा टोला
उस्मानाबाद ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आमचे सरकार असताना शेतकर्यांसाठी जी भूमिका घेतली होती त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जुना व्हिडिओ दाखवत सरकारला याची आठवण करून देत निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 20) उस्मानाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप शिवसेना सत्तेत असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारी निकष बाजूला ठेवत शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 25 हजारांची मदत तातडीने देण्याची मागणी केली होती. तोच व्हिडिओ दाखवत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांनी गतवर्षी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गतवर्षी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेचे निर्वाहन करण्याची त्यांच्याकडे संधी आहे. त्या संधीचा त्यांनी उपयोग करावा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘सरकारने शेतकर्यांना केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नाही. शेतकर्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, तर ’राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत कमी आहे. दीड ते दोन लाख कोटी रुपयांची भरपाई गरजेची आहे. पाहणी-आढावा घेतल्यानंतर मिळणारी मदत येईल तेव्हा येईल. पण आता सरकारने तातडीने मदत करावी’, असे अजित पवार त्या वेळी म्हणाले होते.
ही वेळ राजकारण करायची नाही, तर अधिक संवेदनशील राहायची आहे. सतत केंद्राकडे बोट दाखवणेसुद्धा योग्य नाही. केंद्र सरकार मदत देईलच. राजकीय भाष्य सोडून शेतकर्यांना मदत करा. शेतकर्यांना राजकारणात रस नाही. मलाही यात राजकारण आणायचे नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘जलयुक्त शिवार’चे प्रदर्शन भरवणार
राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोरोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचे प्रदर्शन भरवणार असल्याचे सांगितले. फडणवीस पुढे म्हणाले की, ही मंत्रालयात सह्या करुन टेंडर दिलेली कामे नाहीत. सहा लाख कामे विकेंद्रित पद्धतीने झाली आहेत. जिल्हाधिकारी यांचे प्रमुख होते. त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, कृषी विभाग, जलसंधारण, वन विभागाने कामे केली आहेत. स्थानिक पातळीवर टेंडर काढून एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामे आहेत. असे असताना जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली आहे. अशा चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल असे वाटत असेल तर तसे होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेकरताच काम करणार आहे.