Breaking News

नवी मुंबईत प्रत्येक नोडमध्ये होणार इंग्रजी शाळा

महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान एक इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे.

सध्या पालिकेच्या दिघा ते दिवाळे या क्षेत्रात एकूण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणार्‍या 72 शाळा असून यात 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवी मुंबई पालिकेने या विद्यार्थ्यांसाठी अनेक अद्ययावत सुविधा दिलेल्या आहेत, हे पटसंख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. वाढती विद्यार्थी संख्या आणि बदलता शैक्षणिक कल पाहाता पालिकेने कोपरखैरणे व नेरुळ येथे दोन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा सुरू केलेल्या आहेत. या शाळांनादेखील चांगला प्रतिसाद लाभत असल्याने या वर्षी या दोन शाळांमध्ये आणखी भर घालण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मराठी आणि सीबीएसई शाळांबरोबरच राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या देखील पालिका वाढविणार आहे. सध्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. त्यात यंदा चार ते पाच शाळांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी परवानगीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या शाळा उत्तम दर्जाच्या करण्याचा पालिकेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. बेकायदेशीर शाळांमध्ये पालक प्रवेश घेण्यास मजबूर असतात. त्यासाठी त्यांना अधिकृत पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच नवी मुंबई पालिकेने सीबीएसई व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply