मुरुड : प्रतिनिधी
अविश्वास ठराव संमत झालेल्या सरपंचांना आता ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून, तेथेच त्यांचे भवितव्य ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांच्यापैकी काही सरपंचांकडे पुरेसे ग्रामपंचायत सदस्य नाहीत. अशा थेट सरपंचावर अविश्वास ठराव दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही थेट जनतेमधून निवडून आलो आहोत. अविश्वास ठराव संमत झाल्याने आम्ही ग्रामपंचायतीतून कायमचे बाहेर पडणार आहोत. वास्तविक आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. आम्हाला पाच वर्षे कायमस्वरूपी ठेवण्यात आले पाहिजे, असे मत अविश्वास ठराव मंजूर झालेले थेट सरपंच व्यक्त करीत आहेत. थेट जनतेमधून निवडून आलेल्या सरपंचावर दोन वर्षानंतर अविश्वास ठराव दाखल करता येतो. ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचावर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर महसूल विभागातर्फे सदरचा विषय ग्रामसभेपुढे ठेवला जाणार आहे. ग्रामसभेमध्ये जो निर्णय होईल, तो थेट सरपंचांना बंधनकारक असणार आहे.
मुरुड तालुक्यातील वळके व बोर्ली सरपंचावर अविश्वास ठराव संमत झाले आहेत. मात्र त्यांचा विषय ग्रामसभेपुढे ठेवला जाईल. ती सर्व प्रक्रिया महसूल विभाग करेल. ग्रामसभेमध्ये जो निर्णय होईल, तो थेट सरपंचांना बंधनकारक असणार आहे.
-अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी, मुरूड