पनवेल : रामप्रहर वृत्त
उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार्या या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस दर्शना भोईर, मृणाल खेडकर यांनी दिली असून, या कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन करून या कार्यक्रमाची महिलावर्गाकडून जोरदार तयारी सुरू आहे.