पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे येथून पुष्पक नोडमध्ये स्थलांतरित झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या कामाची रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 4) पाहणी करून आढावा घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून या शाळेची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. विमानतळबाधित उलवे गावाचे पुष्पक नोड, उलवे सेक्टर 24मध्ये स्थलांतर झाले आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेची तेथील शाळाही स्थलांतरित झाली. या न्यू इंग्लिश स्कूलची नव्याने उभारणी केली जात आहे. या स्कूलमध्ये सीबीएसई बोर्डाचे इयत्ता नर्सरी ते पाचवीपर्यंतचे इंग्रजी माध्यम वर्ग असणार असून, आठवी ते दहावी व पुढे बारावीपर्यंत (कॉमर्स व सायन्स)चे वर्गही सुरू होणार आहेत. सध्या नवीन शाळा इमारतीचे काम सुरू आहे. यासाठी अंदाजे 12 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असून, हा सर्व खर्च शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर स्वत: करीत आहेत. नव्या शाळा इमारत उभारणीसंदर्भात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन शरद खारकर यांच्यासह आर्किटेक्ट, इंजिनिअर, कंत्राटदार आदी सर्वांसोबत बुधवारी बैठक घेतली तसेच इमारतीच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी खारकर यांनी सध्या उलवे नोड आरामस कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शाळेच्या अडीअडचणींची माहिती दिली तसेच कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन केले.