छिंडवाडा ः कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईट असते. त्यातही आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता पाण्याऐवजी चक्क अॅसिड प्यायल्याने गंभीर जखमी झाला आहे.
पबजी गेम खेळण्यात व्यस्त असणार्या या मुलाचे लक्ष मोबाईलमध्ये होते. गेम खेळता खेळताच पाणी पिण्यासाठी पाण्याऐवजी चुकून अॅसिडची बाटली उचलून तोंडाला लावली. पाण्याऐवजी अॅसिड प्यायल्यानंतर पोटात जळजळ होऊ लागल्यावर या मुलाला त्याने केलेली चूक लक्षात आली. घरच्यांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टर मनन गोईया यांनी या मुलाच्या आतड्यांवर शस्त्रक्रिया केली. वेळीच उपचार मिळाल्याने या मुलाचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गेम खेळण्याच्या नादात काय पितोय याचे भानच न राहिल्याने हा विचित्र अपघात घडल्याचे या तरुणाच्या घरच्यांनी सांगितले आहे. सध्या या विचित्र अपघाताची चर्चा छिंडवाडामध्ये होताना दिसत आहे. पबजी खेळण्याच्या नादात अनेक मुले जखमी झाल्याचे प्रकार घडल्यानंतर आता पबजी बनवणार्या चीनच्या टेनसेंट कंपनीने या गेम्सवर डिजीटल लॉकच्या माध्यमातून नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. या डिजीटल लॉकमुळे आता या कंपनीने बनवलेले काही गेम खेळण्यासाठी खेळाडूचे वय 13 वर्षांहून अधिक असणे बंधनकारक असणार आहे. डिजीटल लॉकचे फिचर सध्या ‘ऑनर ऑफ किंग्स’ आणि ‘पबजी मोबाईल’ मोबाईल गेम्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने अशा प्रकारच्या जीवघेण्या गेम्सवर निर्बंध आणण्यासाठी कठोर नियम बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. पबजीआधी ब्लू व्हेल गेममुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत. गेम्सच्या आहारी गेलेल्या तरुणांना आजूबाजूच्या स्थितीचे भान राहत नसल्याने अनेकदा गेम खेळताना होणार्या अपघातांमधून अनेकांना जीव गमवावा लागतो.