कर्जत : बातमीदार
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत तालुक्यातील चिंचवली गावात गणेश विसर्जन घाट उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे आणि कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेश विसर्जन करण्यासाठी घाट उपलब्ध नसल्याने चिंचवली गावातील गणेशभक्तांना पावसाळ्यात वाहत्या पाण्यामध्ये धोका पत्करून गणेश विसर्जन करावे लागत होते. हीबाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्या सुप्रीया राजेश भगत यांनी गणेश विसर्जन घाटाचे बांधकाम करण्याची मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली होती. आमदार ठाकूर यांनी या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधी देण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाने पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दरम्यान, नियोजन मंडळाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या गणेश विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या सदस्या सुप्रिया भगत, जोत्स्ना भगत, चेतन भगत, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.