खारघर : प्रतिनिधी
खारघरमधील घोळवाडी या आदिवासी पाड्यात आदर्श सेवा भावी सामाजिक संस्थेच्या वतीने साडीचोळी, मिठाई, फराळ आणि कौटुंबिक वस्तू वाटप करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, श्री बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्त्ता दळवी, संत सावता माळी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बनकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, अजय माळी, पुरंदरे स्न्हे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदानंद सिरस्कर, गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष मनेष पाटील, नगरसेविका मंजुळा कातकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीचा सण घराघरात आनंदात साजरा केला जातो. मात्र, आदिवासी पाडे, गरजू, गरीब व्यक्ती या सणाच्या आनंदापासून वंचित राहतात. अशा वंचितांनाही या सणाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने आदर्श सेवा भावी सामाजिक संस्थेकडून महिलांना साडी चोळी, फराळ, दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी मुर्बी गावातील कै. विनायक तुकाराम पाटील पोलीस पाटील यांच्या स्मरणार्थ प्रत्येक कुटुंबाना हॉटपॉट डब्बा वाटप करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांनी आपल्या जीवनात शिक्षणाचे खूप महत्व आहे. शिक्षणामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लावा असा सल्ला उपस्थित बांधवाना दिला. या वेळी मुर्बी गावातील नक्ष गणेश पाटील या पाच वर्षाचा बाळांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित बालकांना गोड खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी गजानन चव्हाण, विलास कातकरी तसेच बालाजी मित्र मंडळ, संत सावता माळी सामाजिक प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, पुरेंदर स्न्हे सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले.