वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनामुळे होऊ पाहणारी महाप्रचंड जीवितहानी टाळण्यात यश मिळाले हे खरे असले तरी या जालिम उपायाचे परिणाम काही काळ भोगावे लागणार आहेत. तरीही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे अर्थचक्र पूर्णत: ठप्प होऊ दिले नाही. याच काळात त्यांनी आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कित्येक गरजूंना उद्योग व्यवसायासाठी कर्जवाटप करण्यात आले आहे. त्याच आत्मनिर्भर भारत योजनेचा तिसरा टप्पा गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. तब्बल दोन लाख 65 हजार कोटींचे हे तिसर्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी जिद्दीने पाऊल टाकले ही बाब अभिनंदनीय आहे.
अभूतपूर्व अशा परिस्थितीमध्ये यंदाची दिवाळी आपल्या दारात आली आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही तिच्या मंगलमय पावलांचे आपण यथाशक्ती स्वागत करायला हवे. दिवाळीचे दिवस म्हटले की सारा भवताल उत्साहाने ओसंडत असतो. शेतकर्यांपासून धनवंत सावकारांपर्यंत सार्यांच्याच घरामध्ये दिवाळीच्या स्वागताची लगबग असते. कित्येक ठिकाणी अगदी गरिबातल्या गरीब झोपडीच्या बाहेरही दिवाळीचे दिवे तेवताना दिसतात. अर्थात अनेक गरीब बांधवांच्या घरामध्ये दिवाळीच्या काळातही चूल पेटणे कठीण जाते हेही तितकेच खरे. भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरीही दारिद्य्राचे हे दुखणे आपण पूर्णत: संपवू शकलो नाही. कित्येक सरकारे आली आणि गेली, परंतु वंचितांचे हात रिकामेच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचे हे दुर्धर दुखणे अचूक ओळखून गोरगरिबांच्या घरात रोजच्या रोज चूल पेटेल, अन्नधान्याचा पुरवठा नियमित राहील यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. गेल्या सहा वर्षांमधील मोदी सरकारच्या या प्रयत्नांची फळे आता दिसू लागली आहेत. कोरोना विषाणूने उभ्या केलेल्या महासंकटाच्या काळातही मोदीजींनी गोरगरीब जनतेकडे विशेषत्वाने लक्ष दिले. त्यांच्या जनधन खात्यामध्ये मदतीची रक्कम पोहचवली आणि लॉकडाऊनच्या काळात मोफत किंवा अत्यल्प दरात अन्नधान्याचा पुरवठा चालू ठेवला. याची जाण ठेवूनच बिहारमधील महिला वर्गाने भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान केले. भुकेल्याच्या ताटात आपल्याकडच्या भाकरीचा चतकोर काढून द्यावा हे आपले संस्कार आहेत हे विसरून चालणार नाही. यंदा आपल्या घरातील दिवाळीच्या आनंदात एका तरी गरिबाला सामावून घेतले तर तो राष्ट्रकार्यातील खारीचा वाटाच ठरेल. यंदाची दिवाळी अभूतपूर्व अशीच आहे. कारण या घटकेला संपूर्ण विश्वच कोरोना महामारीच्या जीवघेण्या संकटातून जात आहे. आपला देश देखील त्यास अपवाद नाही. लॉकडाऊनच्या दुष्परिणामांमधून आता कुठे देशाचे अर्थचक्र सावरते आहे. रोजगाराचा प्रश्न सार्या जगालाच सध्या भेडसावतो आहे. तसाच तो भारतीय अर्थव्यवस्थेसमोर देखील आव्हान उभे करतो आहे. त्यातून मार्ग काढावयाचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाला पर्याय नाही हे आता उघड झाले आहे. त्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपणही छोटासा वाटा उचलावा, तसेच सरहद्दीवर आपल्यासाठी झुंजणार्या भारतीय जवानांसाठी एक तरी दिवा पेटता ठेवावा. ही दिवाळी कोरोनासारख्या दुष्ट दुरिताचा नायनाट करणारी ठरो आणि आपले आयुष्य सुखकर होवो, ही सदिच्छा. आपणां सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी साजरी करा, पण जपून.