Breaking News

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते उरण येथील फुलमार्केट आणि समाजमंदिर इमारतीचे भूमिपूजन

उरण : वार्ताहर
उरण नगर परिषदेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या फुल मार्केट व आणि समाजमंदिराचे भूमिपूजन शनिवारी (दि. 12) राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
आपल्या भाषणात भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्याचे कौतुक केले. मैत्रीला जपणारा, वचनाला जगणारा, सर्वांना मदत करणारा आणि दिलेले आश्वासन पूर्ण करणारा हा आमदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार महेश बालदी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत कोविड रुग्णालयात पीपीई कीट घालून रुग्णांची चौकशी केली होती. त्याचा आमदार शेलार यांनी या वेळी आवर्जून उल्लेख केला. त्याचप्रमाणे उरण पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विकासकामांबद्दल आनंद व्यक्त केला.
उरणमध्ये भाजपच्या सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे. याचे श्रेय आमदार महेश बालदी यांना जाते, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, आम्ही एका वर्षात काय केले असे विरोधक विचारतात, परंतु आम्ही करून दाखवतो. पुढील काळात ओएनजीसीच्या माध्यमातून पीरवाडी समुद्र किनारा सुंदर व सुशोभित करण्यात येईल. मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, शॉपिंग सेंटर, नगर परिषदेची भव्य इमारत बांधण्यात येईल. विकासाची कामे सुरूच राहतील. नागरिकांना चांगल्या सुखसोई देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या सोहळ्यास उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, भाजप गटनेते तथा शिक्षण सभापती रवी भोईर, पाणीपुरवठा सभापती धनंजय कडवे, आरोग्य सभापती रजनी कोळी, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल कासारे, नियोजन समिती सभापती जान्हवी पंडित, मुख्याधिकारी संतोष माळी, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, विनोद साबळे, तालुका सरचिटणीस सुनील पाटील ,उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, सरचिटणीस निर्मला घरत, शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, हितेश शाह, अजित भिंडे, मनोहर सहतीया, मनन पटेल यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे अरविंद पवार भाजपमध्ये दाखल
उरण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सदस्य अरविंद पवार यांनी शनिवारी (दि. 12) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
पवार यांनी उरणमध्ये झालेल्या फुल मार्केट आणि समाजमंदिर इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, गटनेते रवी भोइर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply