कळंबोली : प्रतिनिधी
म.ए.सो ज्ञानमंदिर, कळंबोली प्रशालेत नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ’वैज्ञानिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने विद्यालयात विविध वैज्ञानिकांचे फोटो लावण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती महामात्र तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विषयाचे प्रा. गोविंद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बालगायकांनी विज्ञान दिनावर आधारित पर्यावरण जोगवा गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासा पूर्ती करण्याच्या उद्देशाने टीयआयएफआर, मुंबई या संस्थेला इ. नववीच्या 17 विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, संजना बाईत, प्रियंका फडके यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर आणि शाळा समिती महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.