Breaking News

उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत 420 नागरिकांचे लचके कुत्र्यांनी तोडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकांपासून 65 वर्षांपर्यंत वृद्ध गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे. तीन महिन्यांपासून सुरू केलेल्या केंद्रात भटक्या कुत्र्यांना पकडून आणण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली, तसेच ते म्हणाले, पकडून आणलेल्या भटक्या कुत्र्यांना या केंद्रात चार दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते. यादरम्यान त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण केले जाते. त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते. तीन महिन्यांत 487 भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रात 38 भटक्या कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत. निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडून आणले आहे त्याच ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. या वेळी काही श्वानप्रेमी, प्राणीप्रेमी संघटनांच्या विरोधालाही सामोरे जावे लागते, मात्र भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील तीन महिन्यांत उरण शहरातच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान श्वानदशांच्या शेकडो घटना घडल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी 24, तर बुधवारी 16 नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. ग्रामीण भागातही ऑक्टोबर-110, नोव्हेंबर-166, तर डिसेंबर महिन्यातील 19 तारखेपर्यंत 104 अशा तीन महिन्यांत 380 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले करून जखमी केल्याची आकडेवारी शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply