पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) संमेलनात ते बोलत होते. कोरोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करीत आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करीत आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आमचे उत्पादकतेवर विशेष लक्ष आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करीत आहोत.
देशातील उद्योजकांना उद्देशून पंतप्रधान मोदींनी म्हटले की, मागील 100 वर्षांपासून आपण सर्व जण देशाच्या अर्थव्यवस्थेला, कोट्यवधी भारतीयांचे जीवन सुकर बनण्यासाठी कार्यरत आहात. आता ती वेळ आली आपल्याला नियोजनही करायचे आहे व त्यावर अंमलबजावणीदेखील करायची आहे. आपल्याला प्रत्येक वर्षीच्या प्रत्येक उद्दिष्टास राष्ट्र निर्माणाच्या मोठ्या उद्दिष्टाशी जोडायचे आहे. आता आगामी काळात आत्मनिर्भर भारतासाठी तुम्हाला संपूर्ण ताकद लावायची आहे. या क्षणी जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या रूपात आव्हाने येतील व समाधानदेखील असेल.
आपले उद्दिष्ट केवळ आत्मनिर्भर भारतच नाही, तर आपण हे उद्दिष्ट किती लवकर साध्य करू शकतो, हेदेखील तितकचे महत्त्वाचे आहे. येणारी 27 वर्षे ही भारताची जागतिक भूमिकाच निश्चित करतील. ती आपल्या भारतीयांची स्वप्ने व समर्पणाचीदेखील परीक्षा पाहातील. ही वेळ भारतीय उद्योग जगताच्या रूपाने तुमची क्षमता, बांधिलकी व धैर्य जगाला दाखवून देण्याची आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.