राष्ट्रवादीकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याची शिवसैनिकांची तक्रार
सांगली ः प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील निवडीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत आहे, अशा तक्रारी शिवसैनिक करीत आहेत. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौर्यात शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील जैन कच्छी भवनमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (दि. 22) करण्यात आले होते. या मेळाव्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या. स्थानिक शासकीय समित्यांवर शिवसेनेतील पदाधिकार्यांना योग्य संधी मिळत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या वेळी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, महाविकास सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जिल्हा पातळीवरील शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांना समान स्थान मिळाले पाहिजे, मात्र सांगली जिल्ह्यात शासकीय समित्यांच्या निवडीमध्ये शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. याबाबत जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकार्यांनीही माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबाबत तक्रारी असतील, तर त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्यांसह पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जातील.
भिवंडीतील काँग्रेसचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत
मुंबई ः भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी बुधवारी (दि. 23) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे हेही उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून, दोन नगरसेवक बाहेरगावी असल्याने बुधवारी त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. लवकरच त्या दोघांचाही प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या नगरसेवकांना पक्षप्रवेशासाठी नकार दिला होता, मात्र सर्व नगरसेवकांनी एकाकी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.