श्रीनगर ः वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा प्रथमच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत भाजप 76 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील गुपकर आघाडीने 100हून अधिक जागांवर विजय मिळवला असला तरी या आघाडीत सात पक्ष समाविष्ट आहेत.
20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 14 जागांवर अशा पद्धतीने एकूण 280 जागांसाठी ही निवडणूक झाली. तब्बल 2178 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. याचा निकाल मंगळवारी (दि. 22) लागला. उशिरापर्यंत कल येणे सुरू होते. भाजपने जम्मूमध्ये सर्वाधिक 76 जागा मिळवल्या आहेत. उधमूपर, सांबा, कठुआ अशा ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झाले. काश्मीरमध्ये भाजपने पहिल्यांदाच विजयश्री संपादन करीत तीन जागा जिंकल्या. यावर प्रतिक्रिया देताना ही बदलाची लाट असल्याचे भाजपने म्हटले आहे.
गुपकर आघाडीमध्ये राजकीय प्रतिस्पर्धी असणारे नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षासह जम्मू काश्मीरमधील स्थानिक पक्षांचा समावेश आहे. काँग्रेसनेही या आघाडीत उडी घेतली होती, तर दुसरीकडे भाजपने सात पक्षांच्या आघाडीविरुद्ध स्वबळावर निवडणूक लढवून जबरदस्त मुसंडी मारली आहे.
जम्मू-काश्मीरमधील लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास असल्याचे या निकालातून सिद्ध होते.
-जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री