सावरोली पुलावर पाणी
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली-खालापूर परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे खोपोली -कर्जत व मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली. महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी भरल्याने पनवेल-खोपोली, खोपोली-पाली वाहतूक विस्कळीत झाली. राष्ट्रीय महामार्ग व एक्स्प्रेस वेला जोडणार्या सावरोली पुलावर पाताळगंगा नदीचे पाणी आल्याने येथील वाहतूकही काही काळ थांबविण्यात आली होती. गणेशोत्सवात पावसाच्या जोरदार हजेरीने खोपोली, खालापुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर गणपतीच्या आगमनाबरोबरच वरुणराजाने पुनरागमन केले. दोन दिवसांत खोपोली व खालापूर परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथील लोकल, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले. पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सावरोली पुलावर नदीचे पाणी चढले. या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीवरही झाला. एक्स्प्रेस वेवर वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू होती. अंबा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बुधवारी खोपोली-पाली रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील अंडर पास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली होती.
तीन अपघात घडले
एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाट ते खालापूर टोल नाका दरम्यान दोन, तर भाताण बोगद्याच्या पुढे एक असे तीन अपघात बुधवारी घडले. यात सात जण किरकोळ, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. या सर्वांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खोपोली शहरात एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणालाही इजा किंवा नुकसान झाले नाही. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने गणेशोत्सवावरच पावसाचा परिणाम झाला आहे.
अतिवृष्टीमुळे माणगावातील गणेशोत्सवावर निरुत्साहाचे पाणी
माणगाव : तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून, अतिवृष्टीमुळे गणेशोत्सवावर निरूत्सहाचे पाणीच पडले. तालुक्यातील इंदापूर, साई, गोरेगाव, निजामपूर, विळे, पाटनुस, भिरा, पळसगाव, लोणेरे, खरवली, मोर्बा, भागातील अनेक दुर्गम गावात जोरदार पावसाने हजेरी लावली असून काळनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.