Breaking News

शिळफाटा टोलमधून स्थानिकांना सूट

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने प्रशासन वठणीवर

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोल नाक्यातून स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सूट न दिल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 28) धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोल नाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्यामुळे टोल नाका प्रशासनाने 1 जानेवारी 2021पासून टोलमध्ये सूट देण्याचे आश्वासन दिले आहे.  
 पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोल नाक्यातून स्थानिक ट्रान्सपोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना सूट दिली जात नव्हती. त्यामुळे त्रिमूर्ती चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी किरवली (रोहिंजण) टोल नाका प्रशासनाविरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाचे आक्रमक स्वरूप पाहून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील धडक मोर्चाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व आंदोलकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आभार व्यक्त केले.
या आंदोलनावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक हरीश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहुशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या सुरुवातीस ज्येष्ठ कार्यकर्ते हरी फडके यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सांगितले की, स्थानिक भूमिपुत्र म्हणून आंदोलन आपल्याला नवीन नाही. सिडको, एमआयडीसी, कॉरिडोर अशा विरोधात अनेक आंदोलने आपण केली आहेत. भूमिपुत्र म्हणून स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, ही आपली कायम भूमिका राहिली आहे. प्रकल्पांसाठी जमिनी संपादित झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो सोडविण्यासाठी छोटे-मोठे उद्योगधंदे केले जातात. येथील स्थानिक टेम्पोच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. स्थानिक म्हणून त्यांना टोलमध्ये सूट देणे क्रमप्राप्त असूनही ती सवलत दिली जात नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी नगरसेवक हरीश केणी यांनी सांगितले की, टोल नाका किरवलीत, पण टोल नाक्याला शिळफाटा नाव दिले गेले. हे चुकीचे असून या टोल नाक्याला किरवली नाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या टोल नाक्यावर स्थानिकांना सूट मिळत नाही हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे एक धडाडीचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने यशस्वी झाली असून हे आंदोलनही यशस्वी होणारच, असा दृढ विश्वास केणी यांनी व्यक्त करून मागण्या पूर्ण न केल्यास टोल नाका पूर्ण बंद करू, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
दरम्यान, आयआरबी टोल नाका प्रशासनाकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत टोल नाक्यावरून रोहिंजण परिसरातील स्थानिक चालक-मालक नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांची माल वाहतूक वाहने विनाशुल्क वाहतूक करीत होती, परंतु सध्या संस्थेच्या वाहनांना टोल आकारला जात असल्याने त्यांना टोलमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी चर्चेदरम्यान केली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  या वेळी प्रशासनाने त्रिमूर्ती चालक-मालक संघटनेच्या वाहनांना 1 जानेवारी 2021पासून टोलमध्ये सूट देण्याचे मान्य केले, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी टोल नाक्यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारासंदर्भात विषय मांडून त्यांना कमी पगारावर काम करावे लागत असल्याने त्यांना 15 हजार रुपये किमान वेतन द्यावे, अशी मागणी या वेळी केली आहे.

या महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्याने साहजिकच स्थानिकांना याच मार्गावरून वाहतूक करावे लागते. येत्या काळात मार्गाचे रुंदीकरण होऊन सर्व्हिस रोड मिळेल, पण तोपर्यंत याच मार्गाचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या वाहतूक वाहनांना प्राधान्याने सूट मिळाली पाहिजे. आयआरबी अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेत टोल सूटचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार स्थानिकांच्या माल वाहतूक वाहनांना सूट मिळणार आहे, मात्र प्रशासनाने माघार घेतल्यास तीव्र आंदोलन करू. टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणीही आम्ही केली आहे. आयआरबी प्रशासन याबाबत सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे.
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply