Breaking News

योगसाधना : सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली

आजच्या संगणकीय, स्पर्धेच्या, आधुनिक युगात प्रत्येक व्यक्ती पैशासाठी, कारकीर्द घडविण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर धावत आहे. त्यामुळे त्याची शारीरिक व मानसिक अवस्था शोचनीय झाली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावत त्याचे शरीर असंख्य रोगांचे केंद्रस्थान बनले आहे. अशा स्थितीत अनेकांना आरोग्याचे महत्त्व पटू लागले आहे. व्यायामशाळेत जाण्याबरोबरच आता अनेक लोक योगसाधनेकडे वळत आहेत. देश-विदेशातील तरुणात योगसाधनेची क्रेझ वाढली आहे. भारतातही योगाभ्यास करण्याची संख्या वाढत आहे.

भारतात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पतंजली मुनींच्या काळापासून योगा भारतात रुजत आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतात, तसेच जगभर योगाचा प्रसार केला. आज भारतात स्वामी रामदेव बाबा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून योगाचा प्रसार होत आहे. जगभर  प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी हा प्रस्ताव मांडला. योगासनाचे फायदे त्यांचे मानवी मन व शरीरावर होणारे परिणाम याचे विस्तृत विवेचन करण्यात आले. काही देशांच्या प्रतिनिधींशी  चर्चा करून हा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेपुढे ठेवण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधी लाभले. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढ्या देशांचे प्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देश या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. या प्रस्तावावर सदस्य राष्ट्रांच्या सह्या झाल्यावर 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला. 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. योग ही कोणत्याही धर्माची परंपरा व अभ्यास नसून ती वैज्ञानिक पंथनिरपेक्ष व सर्वंकष जीवनपद्धती आहे. रुग्णांसाठी ही एक चिकित्सा पद्धत तर योगिन साठी साधना पद्धत, मुक्तीचा मार्ग व जीवनात पूर्णता आणण्याचे हे साधन आहे.

योगा हा शब्द युज या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे म्हणजेच योग. योगाचा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनाच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय. याचे प्रारंभिक स्वरूप हिंदू ग्रंथांमध्ये महाभारत, उपनिषद, पतंजलीचे योगसूत्र आणि हटयोग, प्रदीपिकामध्ये मिळतात. आपले मन व आरोग्य स्वास्थ ठेवण्यासाठी योग करावा. योग हा शरीरातील सर्व अवयवांना निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो. योगामुळे मानवी शरीर लवचिक बनते आणि प्रत्येक कार्य करण्यासाठी सुलभता येते. योगा निव्वळ व्यायाम न मानता त्याचा स्वीकार काही वर्ष जीवनशैली म्हणूनच केला पहिजे.

योगाचे सर्वात महत्त्वाचे फायदे वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगी क्रियांनी वजन कमी होते. योगाच्या साह्याने वजन कमी करता येते, ताणतणावापासून मुक्ती मिळते, रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणार्‍या ताणतणावाचा निचरा करायचा असेल, तर त्यासाठी योगाचा काही मिनिटाचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. रोज योग आणि ध्यान केल्याने अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगासारखा दुसरा उपाय नाही. शरीराचे संपूर्ण संतुलन योगामुळे होते. योगामध्ये सुप्त ज्ञान शक्ती व अन्य दिव्य शक्ती जाग्या होतात. योगामुळे अशुभ व अज्ञान दूर होते. योग हे मनुष्याचा बाह्य व आंतरिक विकास घडवून आणण्याचे सर्वांगीण साधन व माध्यम आहे. रोगमुक्त, तणावमुक्त, व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि आयुष्यात सुख, समृद्धी व शांतता आणण्यासाठी सकाळी व संध्याकाळी एक तास योगासाठी देणे आवश्यक आहे, तर ते जे करतात त्यांच्या जीवनात प्राधान्य आपोआपच पूर्ण होऊ लागतात. योग म्हणजे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळण्याची एक बहुगुणी आणि प्राचीन पद्धत. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा वेळ तरी योगासाठी देणे आवश्यक आहे. ताणतणावांवर मात करणं, फिटनेस राखणे यासाठी नित्य योगासनं करणं फायदेशीर ठरतं.

योगा ठराविक वयानंतर करायला हवा असा काही तरुण तरुणींचा समज आहे, पण तसं नाही दैनंदिन जीवनात योगाचे फायदे काय आहेत हे जाणून घ्यायला हवेत आणि योग आचरणात आणायला हवा. रोज जाणवणारा ताण नाहीसा करण्यासाठी प्राणायाम व ध्यानधारणा उपयुक्त ठरू शकते. योगामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही फिट राहता येते. आजच्या योग दिनानिमित्त प्रत्येकाने हा संकल्प करायला हरकत नाही.

-एच. एन. पाटील (उपशिक्षक) छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply