अलिबाग : प्रतिनिधी – टाकाऊ आणि निसर्गाला हानिकारक ठरणार्या प्लास्टिकपासून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील सर्वेश पाटील आणि संकेत जाधव या दोन तरुणांनी पेट्रोल- डिझेलची निर्मिती करून दाखविली आहे.
कणकेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या मापगाव या छोट्याशा गावात राहणारे हे तरुण केवळ 27-28 वर्षांचे आहेत. संकेत जाधव हा बॉयलर ऑपरेटर आहे, तर सर्वेशने इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा आणि इलेक्ट्रॉनिक तसेच फायर अॅण्ड सेफ्टीचा कोर्स केला आहे. सर्वेशचे अलिबागेत वॉटर प्युरिफायचे दुकान आहे. अलिबागेत जो कचरा जाळला जातो त्यात प्लास्टिकही मोठ्या प्रमाणात असते. सध्या सर्वत्र प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम चर्चेत आहेत. शासनाने बंदी घालूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात, गावातही प्लास्टिक पिशव्या किंवा प्लास्टिक खोके रस्त्याच्या कडेला पडलेले पाहायला मिळतात. प्रदूषणात भर घालणार्या या प्लास्टिकची कशी विल्हेवाट लावायची यावर अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी उपक्रम राबवत असतात. या प्लास्टिकचे पूर्ण विघटन कसे करू शकतो यावर आपण विचार केला. पूर्ण अभ्यास केला आणि त्यातून प्लास्टिकमुक्त अभियानाला तर आपला प्रोजेक्ट पूरक ठरेलच शिवाय या टाकाऊ प्लास्टिकपासून पेट्रोल-डिझेलची निर्मिती होऊ शकते हे देखील लक्षात आले, असे सर्वेश पाटीलने सांगितले.
आपल्या उपक्रमाची माहिती सर्वेशने गावातील त्याचा मित्र संकेतला दिली आणि त्याच्या बॉयलर ऑपरेटरच्या ज्ञानाचा फायदा घेऊन दोघांनी मिळून एक यंत्रणा उभी केली आणि प्रात्यक्षिक स्वरूपात टाकाऊ प्लास्टिकपासून डिझेल-पेट्रोल निर्मितीचा प्रयोग राबविला. अथक मेहनत आणि अभ्यासातून सर्वेश पाटील व संकेत जाधव यांनी तो प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या प्लास्टिकवरील प्रयोगातून निघणारे कार्बन डांबर प्रोजेक्टमध्येदेखील वापरता येईल, असे सर्वेशने सांगितले.
टाकाऊ प्लास्टिकचा 100 टक्के वापर
पर्यावरणाला हानिकारक असणार्या प्लास्टिकचा पेट्रोल-डिझेल निर्मितीत 100 टक्के वापर करता येतो. सर्व प्रकारचे प्लास्टिक वितळून त्यातून निघणार्या तेलावर प्रयोग करून ते पेट्रोल-डिझेल निर्मितीसाठी वापरात येते, शिवाय प्लास्टिकमुक्त गाव, शहर होण्यास त्याचा खूप फायदा होईल, असे सर्वेश आणि संकेत यांनी सांगितले.
सुरुवातीला छोट्या स्वरूपात हा प्रयोग केला. त्यात यश आल्याने मोठ्या प्रमाणात हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पत्र्याची शेड उभारल्याचे संकेत जाधवने सांगितले. विशेष म्हणजे केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर या प्रयोगातून तयार होणारी वाफ, राख यातून इतर उपकरणेही तयार करू शकतो, असेही या दोघांनी सांगितले
दिवसाला हजार किलो प्लास्टिकवर प्रक्रिया.
हा प्रोजेक्ट आम्ही केवळ अर्थार्जन म्हणून नव्हे, तर प्लास्टिकमुक्ती डोळ्यांसमोर ठेवून तयार केला. त्यात बर्यापैकी यश आले आहे. दिवसाला किमान एक हजार किलो प्लास्टिकवर 12 तासांत प्रक्रिया करता येईल, असा विश्वास सर्वेश आणि संकेतने व्यक्त केला. मापगावसारख्या छोट्या गावात राहून सर्वेश आणि संकेतने उभारलेला प्लास्टिकमुक्तीबरोबरच पेट्रोल-डिझेल निर्मितीचा प्रकल्प कौतुकास्पद आहे.