कर्जत पोलिसांची कारवाई
कर्जत : प्रतिनिधी – खोदकाम करताना आम्हाला दोन किलो सोन्याचे मणी सापडले आहेत, असे सांगून कर्जतमधील व्यापार्याची फसवणूक करणार्या तिघा जणांना कर्जत पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत जेरबंद केले आहे.
गुजरात येथे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करीत असताना एका लोट्यामध्ये आम्हाला दोन किलो सोन्याचे मणी मिळालेले आहेत, असे सांगून दोन अज्ञात इसमांनी कर्जत शहरातील व्यापारी संदीप तुकाराम थोरवे यांना 18 ऑगस्ट 2020 रोजी त्यापैकी काही सोन्याचे मणी दिले. हे मणी सोन्याचे असल्याची खात्री पटल्याने थोरवे यांनी सात लाख रुपये देऊन दोन किलो सोन्याचे मणी विकत घेतले. त्यानंतर सदरचे मणी सोनाराकडे चेक केले असता ते सोन्याचे पिवळे पॉलिश असलेले अॅल्युमिनियमचे मणी असल्याचे उघडकीस आले. या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संदीप थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी 25 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे व पोलीस अंमलदार भूषण चौधरी यांनी तांत्रिक पुराव्याची मदत घेऊन अवघ्या 15 दिवसांमध्ये गुन्ह्यातील धीरज राजाराम राठोड (रा. ठाणे) व दौलत चुनीलाल सोलंकी (रा. वांगणी) दोन आरोपींना बदलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांना ब्रिटिशकालीन 1936 व 1983 सालातील चांदीची नाणी व सोन्याचे मणी मिळून आले. अधील चौकशीत गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लखन दौलत सोलंकी (रा. वांगणी, ता. अंबरनाथ) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केल्याचे कळताच लखन सोलंकी फरार झाला. तो लोणी काळभोर (जि. पुणे) येथे लपून बसल्याची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटन पथकाने तेथे जावून त्याला ताब्यात घेतले. अधीक तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर कळवा आणि ऐरोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस नाईक सचिन नरुटे, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, अश्रुबा बेंद्रे यांनी ही कारवाई केली.