कर्जत : बातमीदार – शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने होत असलेल्या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी नगर परिषदेकडून मान्य न झाल्यास हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कर्जत नाभिक समाज सामाजीक संस्थेने तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर (सिटी सर्वे नंबर 144/19) गैरमार्गाने सुरु असलेल्या बांधकामाबाबत तहसील कार्यालयाकडे विविध तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीनेही करण्यात येत आहे. मात्र गेल्या दोन वर्षात अधिकारी आणि घोटाळा करणार्या व्यक्तीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नाभिक समाज सामाजिक संस्थेने केला आहे.
1 जानेवारी 2021 पर्यंत सदर जमिनीवरील बांधकाम थांबवावे आणि सदर जमीन शासनजमा करण्याची कारवाई करावी तसेच या प्रकरणी फौजदारी चौकशीचे आदेश न दिल्यास हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिना (दि. 2)पासून कर्जतमधील नाभिक समाज बांधवांची दुकाने बेमुदत बंद ठेवून
संस्थेच्या वतीने कर्जत येथील लो. टिळक चौकात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.