नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या बहाण्याने कंपनी बंद करून त्यांनी कोट्यवधींचा अपहार केला आहे, मात्र त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करीत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरात स्मार्ट व्हिजन प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून चिटफंड चालवला जात होता. या कंपनीत जादा नफ्याच्या आमिषाला भुलून अनेकांनी पैसे गुंतवले होते, मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत संबंधितांनी कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला होता, तर लॉकडाऊनमुळे कंपनी तोट्यात गेल्याचे कारण गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. अशातच त्याच कंपनीच्या प्रमुख व्यक्तींनी दुसरी कंपनी स्थापन करून त्याच पद्धतीने नागरिकांची लूट चालवली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या पथकाने रविवारी रात्री रॉयल ऑर्चिड हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकला. हे बिझनेस सेमिनार रिचहूड क्लब नावाच्या कंपनीमार्फत सुरू होते. दरम्यान, या वेळी पोलिसांनी कंपनीच्या संचालकांबाबत अधिक चौकशी केली असता स्मार्ट व्हिजन कंपनीच्या प्रमुख व्यक्तींनीच रिचहूड नावाने नवीन कंपनी स्थापन केली असल्याचे समोर आले. त्यानुसार नऊ जणांना अटक करून त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.